अकोला- परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेती धोक्यात आली आहेत. सोयाबीन, ज्वारी, कपाशी या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेती आणि शेतकरी दोन्ही संकटात सापडले आहेत. अंदाजे साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने ठाण मांडले आहे. सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतीपिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन, ज्वारी, कपाशी या पिकांचे नुकसान झाले आहे. कापून गंजी लावलेल्या पिकांबरोबरच उभ्या पिकांनाही कोंब फुटले आहे. यामुळे शेती आणि शेतकरी दोन्ही संकटात सापडले आहेत. शेतीचे नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याचे पार कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे.
जिल्ह्यातील बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील शेतातील ज्वारी, सोयाबीन, कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतीमालाच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे, सर्वच राजकीय पक्षांनी पंचनामे करून अहवाल तयार करण्याची मागणी केली असून नवनिर्वाचित आमदारांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांची व्यथा एकूण घेतली. तर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पंचनामे तयार करण्यासाठी शेतकरी संबंधित अधिकाऱ्याकडे धाव घेत आहेत.
सोयाबीनला फुटले कोंब
परतीच्या पावसाने उभ्या सोयाबीनला चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसात सोयाबीनच्या शेंगा ओल्या झाल्याने तिला कोंब फुटले आहे. त्यामुळे हे सोयाबीन विकणे योग्य नसून ते काळे पडण्याच्या स्थितीत आहे. अशा सोयाबीनमधून शेतकऱ्यांना एक दमडीही मिळणार नसल्याची स्थिती आहे.