अकोला: या आंदोलनात जे लोक नव्हते त्यांनाही गोवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. खोट्या केसेस आमच्यावर दाखल करण्यात आलेले आहेत. गंभीर गुन्हे आमच्यावर लावण्यात आलेले आहेत. त्यांना वाटत की चळवळ मोडून काढू आणि आंदोलन होणार नाही. पण मी यांना सांगू इच्छितो जेवढं तुम्ही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कराल त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने आम्ही भविष्यात आंदोलन करू. पुढचे आंदोलन हे आर या पार असेल. सरकारच्या खुर्चीला आग लावणार असेल. तुम्ही आम्हाला तुरुंगात टाका. आम्ही आंदोलन करणार. आम्ही हक्कासाठी रस्त्यावर उतरणार, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
कारागृहातुन जामिनीवर सुटका: कापूस आणि सोयाबीन पिकाला भाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करून न्यायालयीन कोठडीत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह 25 जणांची आज सकाळी अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातुन जामिनीवर सुटका झाली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले, यावेळी कारागृह परिसरात रविकांत तुपकर यांचा त्यांची आई, पत्नी व बहिणीने औक्षत केले. यावेळी इतरही शेतकरी यांचे हारफुल घालून सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
आत्मदहनाचा प्रयत्न केला होता:बुलढाणा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून 10 फेब्रुवारीला आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या वेशात रविकांत तुपकर हे आत्मदहन करण्यासाठी आले होते. पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी तुपकरांनी केला होता. प्रीमियम भरूनही शेतकऱ्यांना अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा होत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप ही त्यांनी केला होता.