अकोला - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून सरकारने संचारबंदी लागू केली आहे. या काळात सर्वच धर्माचे सण, उत्सव हे घरी राहूनच साजरे केले जात आहेत. याचा आदर्श घेऊन मुस्लिम बांधवांनी रमजान हा पवित्र सण घरी राहून साजरा करावा. तसेच घरातच नमाज अदा करावी, असे आवाहन येथील प्रमुख व ज्येष्ठ धर्मगुरू मुफ्ती ए बरार अब्दुल रशीद कारंजवी यांनी केले.
रमजाननिमित्त नागरिकांनी घरी बसूनच नमाज अदा करावी; मुस्लिम बांधवांना आवाहन - akola
रमजान महिन्यात नागरिकांनी मशिदमध्ये न येता घरीच राहून नमाज अदा करावी. तसेच आपल्या परिवारासोबत इफ्तार पार्टी करावी,असे आवाहन मुफ्ती ए बरार अब्दुल रशीद कारंजवी यांनी केले आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याचे पालन करणे हे सर्वांचे काम आहे. या काळात येणारे सर्व सण, उत्सव शांततेत साजरे करणे हे आपले काम आहे. दरवर्षी आपण सर्व एकत्र येऊन रमजानचा उत्सव साजरा करीत असतो. मात्र,या वर्षी संचारबंदीच्या काळात पवित्र रमजान महिना आला आहे. यावेळी कोरोना विषाणूमुळे सामाजिक अंतर ठेवणे, सुरक्षित राहणे याचे पालन करणे गरजेचे आहे. जेणेकरून कोरोना विषाणूचा संसर्ग कोणाला होणार नाही.
रमजान महिन्यात नागरिकांनी मशिदमध्ये न येता घरीच राहून नमाज अदा करावी. तसेच आपल्या परिवारासोबत इफ्तार पार्टी करावी. या महिन्यात आपण व आपल्या कुटुंब सदस्यांची काळजी घेऊन हा उत्सव घरीच साजरा करू, असे आवाहन धर्मगुरू मुफ्ती ए बरार अब्दुल रशीद कारंजवी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनला बोर्ड सदस्य मुफ्ती मोहम्मद अशफाक कासमी,अकोला जिल्हा अध्यक्ष जमीअत उलामा ए हिन्द, वसी उल्लहा यांनी केले आहे.