अकोला - जिल्ह्यात सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर बुघवारी रात्री पावसाने हजेरी लावली. अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मध्यम स्वरूपाच्या पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
जिल्ह्यातील काही भागात जवळपास तासभर पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
हवामान विभागाने दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. बुधवारी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर रात्री दहा वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. तासभर पडलेल्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकांचे पुन्हा नुकसान होणार आहे. खरीप हंगामातील पिके देखील पावसामुळे खराब झाली. रब्बी हंगामातील पीकांमुळे आर्थिक बजेट सुधारेल या आशेवर शेतकरी होता. मात्र अवकाळी पावसाच्या माऱ्यानं रब्बीतील पीक सुद्धा खराब होण्याच्या मार्गावर आहेत. या पावसामुळे हरभरा, गहू आणि फळबागांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.