अकोला :राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर राहुल गांधींकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते आज अकोल्यात माध्यमांच्या प्रतिनिधिंशी संवाद साधत होते. गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी 7 जुलै रोजी मोदी आडनावावरून दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींविरोधात निकाल दिला आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
नरेंद्र मोदीं बाबर व्हायला निघालेले :शासकीय विश्रामगृह येथे पुढे ते म्हणाले की, त्यांनी मध्यंतरी घोषणा अशी केली की, नवीन सरकार येण्याच्या अगोदर युनिफॉर्म सिविल कोड लागू करणार. अनेक राजकीय पक्षांना मेल आले की, तुमचे म्हणणे मांडा. कमिशनला आम्ही उलट विचारले की, आम्ही कशावरती अभिप्राय द्यायचा आहे, ते आम्हाला पहिल्यांदा कळवा. दुर्दैवाने नरेंद्र मोदी बाबर व्हायला निघालेले आहेत. पण बाबर होण्याअगोदर घरात गॅस आहे की नाही हे त्यांनी बघितले नाही. अन्नधान्य आहे की नाही हे त्यांनी बघितले नाही.