अकोला- जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत असून याला संपूर्णपणे जवाबदार सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चव्हाण, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आयुक्त जवाबदार आहेत,असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. प्रशासनावर राजकीय नेतृत्वाचा वचक नाही. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी गायब आहेत. या आणीबाणीच्या प्रसंगी कुणीही समोर येऊन काम करीत नाही,असेही पुंडकर म्हणाले.
कोरोनाच्या अटकावसाठी त्रिस्तरीय व्यवस्था आहेत ज्यात कोव्हिड केअर, कोव्हिड हेल्थ आणि कोव्हिड क्रिटिकल याचा समावेश होतो. कोव्हिड क्रिटिकल सोडून इतर दोन्ही व्यवस्था कार्यान्वित नाहीत. त्यामुळे सर्व भार वैद्यकीय महाविद्यालयावर आला असून त्यांना नाहक रोषाला तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य सेवा यंत्रणा वैद्यकीय महाविद्यालयाला सहकार्य करत नाही. जिल्हा शल्य चिकित्सक चव्हाण यांनी आजतागायत कोव्हिड वॉर्डला भेट दिली नाही. तसेच ते कार्यालयात न येता घरूनच काम करतात, असा आरोप धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला.
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कोरोना वॉरियर्स यांना पुरेशी सुरक्षा साधन उपलब्ध करून दिले नाहीत. पीपीई किट खरेदी केली पण ग्रामीण भागात आणि आशा वर्कर, डॉक्टर, नर्सेस कर्मचारी यांना दिल्या नाहीत, यामध्ये भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता पुंडकर यांनी व्यक्त केली. मूर्तिजापूर येथील प्रकरणात रुग्णाचा रिपोर्ट येण्यापूर्वीच मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केला आणि अंत्ययात्रेत शेकडो लोक सहभागी झाले. त्यामुळे त्या भागात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो या साठी आपत्ती व्यवस्थान कायदा व 144 कलमाचे उल्लंघन झाले आहे. म्हणून मूर्तिजापूरचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे. तसेच तेथे उपस्थित लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी पुडंकर यांनी केली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि संस्थात्मक विलागीकरण सुरू करावे. त्यासाठी सर्व मंगल कार्यालय, महाविद्यालयांची वसतिगृहे, हॉटेल अधिग्रहित करावे, तिथे उपचार आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करावी. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, कर्मचारी , नर्सेस, आशा वर्कर, सफाई कर्मचारी आणि सर्व संबंधित लोक, पोलीस जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. त्यांना प्राशासन आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सहकार्य करावे. तसेच या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांचेविरुद्ध आम्ही तक्रार दाखल करणार आहोत, असेही धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले.