अकोला -संचारबंदीच्या काळात गरिबांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही थाळी वाटताना कोणतीही गडबड होऊ नये, याची काळजी संबंधित यंत्रेनेने घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज घेतलेल्या बैठकीत केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. तसेच प्रत्येक गरजवंताला भोजन हे भेटलेच पाहिजे, या पद्धतीने नियोज करा अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागात गोरगरिबांना आणि गरजवंताला शिवभोजन थाळी भेटली पाहिजे, यासाठी संबंधित तहसीलदार, पुरवठा अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियोजन करावे. कोणीही जेवणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच शिवभोजन थाळीमध्ये काय जेवण देण्यात येणार आहे, ते कितीप्रमाणत देण्यात येणार आहे, याचे योग्य नियोजन करावे. तसेच प्रत्येक शिवभोजन थाळी केंद्रावर मोठे फ्लेक्स लावावेत. त्यामध्ये वाटपाच्या नियोजनाची सर्व माहिती नमूद असावी. अशा सूचना देखील यावेळी बच्चू कडू यांनी दिल्या आहेत.