अकोला - कोरोना विषाणूमुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. परंतु, पुण्यातील प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्यासाठी खासगी बस वाहतूकदार हे प्रवाशांकडून दुप्पट किंवा तिप्पट तिकीट दर आकारून आपला खिसा गरम करत आहेत. प्रवाशांची होणारी लूट थांबवण्याची मागणी आता प्रवाशांकडून होत आहे. विशेष म्हणजे, सध्या रेल्वे वाहतूक बंद करण्यात आल्याने खासगी बस वाहतूक कंपनीने ही दरवाढ केली आहे.
कोरोना इफेक्ट : खासगी बसचे तिकीट दर वाढले; पुण्यावरून येणाऱया प्रवाशांना फटका - corona effect on bus
कोरोना विषाणूमुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. परंतु, पुण्यातील प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्यासाठी खासगी बस वाहतूकदार हे प्रवाशांकडून दुप्पट किंवा तिप्पट तिकीट दर आकारत आहे.
उन्हाळ्याची सुट्टी किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये खासगी बस वाहतूकदार हे प्रवाशांकडून येण्यासाठी आणि जाण्यासाठी दुपटीने तिकीट दर आकारतात. सध्या खासगी बस वाहतूकदारांसाठी हा ऑफ सिझन आहे. मात्र, पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांकडून आठशे ते हजार रुपये तिकीट दर घेण्यात येत असून पुण्यातून प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्यासाठी दुपटीने किंवा तिपटीने तिकीट दर आकारले जात आहेत. ऑफ सिझन असून प्रवाशांना आर्थिक फटका खासगी बसचालक देत आहेत. तर, दुसरीकडे पुण्यात कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त असल्याने तेथील शाळा, महाविद्यालय बंद झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आपापल्या गावी जात आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना ठरलेल्या तिकीट दरापेक्षा जादा पैसे मोजावे लागत आहेत.
अशा कठीण परिस्थितीत खासगी बसचालक विद्यार्थ्यांची पैशांसाठी अडवणूक करून त्यांची आर्थिक लूट करत आहेत. हा प्रकार गंभीर असून अशा बिकट परिस्थितीत होणारी लूट थांबवण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत खासगी बसचालक, मालकांशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.