अकोला- कारागृहातून बाहेर पडण्यासाठी बंदिवानविविध कारणे देत होते. त्यामध्ये मुख्य कारण प्रकृती अस्वस्थ झाल्याचे होते. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येत होते. कोरोना रुग्णांवर याच ठिकाणी उपचार सुरू आहेत. म्हणूनच की काय, कोरोनाच्या काळात बंदिवानांची प्रकृती बिघडलेली नाही. संचारबंदी लागू झाल्यापासून एकही बंदिवान हा प्रकृती खराब असल्याचे कारण सांगून उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बंदिवानाना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सींगचे काटेकोर पालन केले जात आहे.
कोरोनाचा धसका; बंदिवान देईनात प्रकृती खराब झाल्याची कारणे! - कारागृह प्रशासन अकोला
कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यातील काही कारागृहामधील बंदिवानांना झाला आहे. तेव्हापासून कारागृह प्रशासनाने बंदिवानांची विशेष काळजी घेण्याचे आदेश राज्यातील सर्वच कारागृह अधीक्षकांना दिले आहेत. संचारबंदीमुळे गुन्हे दाखल होण्याचे वर्षभरातील प्रमाण हे या दोन महिन्यांत अर्ध्यावर आले आहे.
अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 695 बंदिवान ठेवण्याची क्षमता आहे. सध्या याठिकाणी 375 बंदिवान आहेत. खुले महिला कारागृहही या परिसरात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यातील काही कारागृहांमधील बंदिवानांना झाला आहे. या पार्श्वभूमीवर बंदिवानांची विशेष काळजी घेण्याचे आदेश राज्यातील सर्वच कारागृह अधीक्षकांना दिले आहेत. त्यासोबतच कारागृहामध्ये बंदिवानांची संख्या वाढू नये, म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. कारागृह प्रशासनाकडून बंदिवानांच्या तोंडावर मास्क, त्यांच्यासाठी वेळोवेळी हात धुण्यासाठी केलेली व्यवस्था, सॅनिटाझरची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे, या बंदिवानाच्या जेवणाचीही काळजी घेतली जात आहे. कारागृहात असलेल्या बॅरेकमध्ये सोशल डिस्टन्सींगचे पालन करत त्यामधील बंदिवानाना दुसऱ्या बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे.
संचारबंदीमुळे गुन्हे दाखल होण्याचे वर्षभरातील प्रमाण हे या दोन महिन्यांत अर्ध्यावर आले आहे. कोरोनाच्या बंदोबस्तात अडकलेल्या पोलिसांना गुन्ह्याचा तपास लावणे शक्य नाही. नवे बंदिवानही येण्याची संख्या एकदमच कमी झाली आहे. गरज असेल, तरच किंवा महत्त्वाचे कारण असेल, तरच नातेवाईकांना भेटण्याची परवानगी दिल्या जात आहे. त्यामुळे कारागृहातच भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची ही संख्या रोडावली आहे.