अकोला - 'रेल्वेने सांगितले की, आम्ही माजी कर्मचाऱ्यांना पेन्शन देऊ शकत नाही. कर्मचाऱ्यांना वेतनही देऊ शकत नाही. मध्यंतरी अशोक चव्हाण यांनीही असे म्हटले की, आम्ही जुलैनंतर कर्मचाऱ्यांचे वेतन देऊ शकू का? असे असताना मग हे सरकार निविदा कशी काढते आणि कंत्राटदारांना पैसे कसे देते' हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
तसेच, तिजोरी खाली असलेले कारण समोर करताना सरकारकडून कंत्राटदारांना मात्र कामे दिली जात आहेत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. ते आज (सोमवार) अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद... हेही वाचा -शिवसेनेने राम मंदिरासाठी काहीही न करता केवळ पोकळ दावे केले; चंद्रकांत पाटलांची टीका..
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, लोकांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधीची कोरोना टेस्ट करून घेण्याचा वटहुकूम मुख्यमंत्री यांनी काढावा. कोरोनाची आकडेवारी येत आहे त्याबद्दल साशंकता आहे. मृत्यू दर 3 पेक्षा कमी आहे, बरे होण्याचा रेट 66 टक्के दाखवीत आहे, हे गणित कळण्यापलीकडचे आहे. या आकडेवारीमध्ये घोळ असल्याचेही ते म्हणाले.
प्रिंट मीडिया माध्यमातून आशादायक तर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे भीतीदायक वातावरण निर्माण केले जात आहे. सरकारने जर एक ऑगस्टनंतर लॉकडाऊन जाहीर केले. तर, आम्ही हे लॉकडाऊन तोडण्याचे आव्हान नागरिकांना करणार. त्यासाठी जेलमध्ये जाण्याचे काम पडले तरी आम्ही जाऊ, असा खरमरीत इशारा त्यांनी शासनाला दिला आहे.
कोरोनाबरोबर आता शिकायला हवे. शासनाने नागरिकांना वेठीस धरू नये. तसेच आतापर्यंत दान करणाऱ्यांची क्षमता संपली आहे, असेही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. या पत्रकार परिषदेत प्रदेश प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखेडे, प्रमोद देंडवे, अरुंधती शिरसाट, प्रसन्नजित गवई, महादेवराव शिरसाट, पराग गवई, विलास जगताप यांच्यासह आदी उपस्थित होते.