अकोला -भंडाऱ्यातील घटना दुर्दैवी आहे. राज्य सरकारचे 'वरातीमागून घोडे' अशी गत आहे. एखादी शासकीय वास्तू उभी केल्यानंतर तिचे ऑडिट झाले पाहिजे. मात्र, आपल्याकडे हे नियमीतपणे होत नाही. भंडारा शासकीय रुग्णालयाच्या देखभालीची जबाबदारी ज्या अधिकाऱ्याकडे होती त्यांनी आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
भांडारा येथील सामान्य रुग्णालयात दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेबाबत देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. इमारतींचे बांधकाम सरकार करते. नियमाप्रमाणे त्याचे ऑडिट व्हायला पाहिजे. मात्र, ऑडिटसाठी खर्च होतो. त्यामुळे ऑडिट टाळले जाते. मात्र, त्याचा परिणाम म्हणून अशा दुर्दैवी घटना समोर येतात. यामध्ये सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर, अशा घटना वारंवार होतील, असेही आंबेडकर म्हणाले.