अकोला :वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.'गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रती महिना 100 कोटी वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप परबिर सिंग यांनी केला आहे. जर भाजप 100 कोटीमध्ये सहभागी नसेल तर त्यांनी सरकार बरखास्त करून दाखवायला पाहिजे', असे आव्हान प्रकाश आंबेडकरांनी भाजपला दिले आहे. शिवाय, 'जर भाजप हे ठाकरे सरकार बरखास्त करू शकत नसेल, तर ते या 100 कोटी वसुलीच्या प्रकरणात भागीदार आहे असं समजून जा', असा दावाही आंबेडकरांनी केला आहे. अकोला शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
100 कोटी वसुलीचा निर्णय कॅबिनेटचा की तिन्ही पक्षांचा?
'गृहमंत्री अनिल देशमुखांनी 100 कोटी रुपये महिना वसूल करण्याचे आदेश दिले असल्याचे आरोप केले. हा निर्णय गृहमंत्री कार्यालयातून कम्युनिकेट झाला. तो कॅबिनेटमधून किंवा तीन पक्षांच्या आदेशावरून झाला, याचा अद्याप पर्यंत कुठलाही खुलासा झालेला नाही. 100 कोटी वसूल करण्याचा जो आदेश देण्यात आलेला आहे किंवा त्यासंदर्भात कुठली चौकशी आणि माहिती आहे. वसुलीचा हा कॅबिनेटचा निर्णय आहे की या तिन्ही पक्षांचा आहे? हा कुठल्या सिक्रसीचा भाग आहे? हे पहिल्यांदा स्पष्ट करावे. राजकारण, सत्ता आणि प्रशासन यांची हातमिळवणी झालेली दिसते. या हातमिळवणीतून वसुलीचे राज्य बाहेर पडते. अशी परिस्थिती आहे', असा आरोप करत आंबेडकरांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
हेही वाचा -कोर्टाने आदेश दिले तर परमबीर सिंह यांच्या आरोपांची चौकशी करण्यास केंद्राची तयारी
भाजपही या भ्रष्टाचारात सहभागी
'याच्या उलट गृहमंत्र्यांना भेटून दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, भाजपही या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहे. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की आम्ही सर्वच गोष्टी बाहेर आणू शकत नाही. अमित शहा यांना आम्ही एवढेच सांगू इच्छितो की तुम्ही फक्त गृहमंत्री आहात', असा टोला प्रकाश आंबेडकरांनी भाजपला लगावला आहे.