अकोला - केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत जाहीर केलेले लॉकडाऊन हे जबरदस्तीचे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. आयएमएफ यांनी घातलेल्या अटींवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
30 जूनपर्यंतचे लॉकडाऊन हे जबरदस्तीचे, प्रकाश आंबेडकरांचा आरोप - लॉकडाऊनवरुन प्रकाश आंबेडकरांची सरकारवर टीका
केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत जाहीर केलेले लॉकडाऊन हे जबरदस्तीचे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.
केंद्र शासनाने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. पण ते सगळे पॅकेज जो प्रोड्युसर आहे, त्याच्या बाजूचे म्हणजे जो निर्माण करतो त्याच्या बाजूचे पॅकेज आहे. या कोरोनाच्या काळात सर्वसामान्य माणसाच्या खिशामधला आणि त्यांनी जमवलेला निधी हा संपलेला आहे. अर्थव्यवस्था पुन्हा स्वतःच्या पायावर उभी करायची असेल तर जशी प्रोडक्शन साईड महत्त्वाची आहे, तशी मागणाऱ्यांची साईड हीसुद्धा महत्त्वाची आहे. मागणाराच नसेल तर प्रोडक्शन करून काय उपयोग आहे. म्हणून आम्ही वारंवार असे म्हणतोय की या 20 लाख कोटीच्या पॅकेजची पुनर्रचना झाली पाहिजे. या पुनर्रचनेमध्ये मागणी करणारा वर्ग आहे मजूर, मध्यमवर्गीय. यांच्या हातामध्ये निधी कसा जाईल हे आपण पाहिला पाहिजे. अर्थव्यवस्था पायावर उभी करायची असेल हे करणे गरजेचे आहे. त्यांच्या हातामध्ये येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये जेवढा निधी मिळेल तेवढा निधी त्यांनी खर्चच केला पाहिजे, हे बंधन घातलं तर अर्थव्यवस्था आपल्या पायावर उभी राहू शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
या सरकारकडे कुठल्याही योजना नाहीत. जे काही पॅकेज आले हे पॅकेज उपयोगाचे नाही. अर्थव्यवस्था अजून ढासळेल अशी चिन्हे दिसायला लागल्याचे आंबेडकर म्हणाले. ज्यांनी ज्यांनी धर्माच्या नावाने मतदान दिलं त्या सगळ्यांना माझा आव्हान आहे की, धर्म हा माणसासाठी आवश्यक असतो आणि व्यवस्था राज्य चालवण्यासाठी असते. हा फरक आपण लक्षात घ्या तरच देशाला आणि समाजाला वाचवू शकतो, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.