अकोला- कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, सध्या खरीप हंगाम तोंडावर असल्याने या लॉकडाऊनमधून कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यास काही प्रमाणात मुभा दिली आहे. जिल्ह्यात सध्या कृषी केंद्र दुकाने उघडण्याची वेळ सकाळी सात ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. मात्र, खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू झाल्याने बियाणे घेण्यासाठी शेतकरी पहाटेपासूनच दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत प्रहार संघटनेच्या वतीने पहाटेपासून बियाणे खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना चहा पाण्याचे वाटप करण्यात आले.
खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी लॉकडाऊन काळातही शेतकरी बियाणे खरेदीसाठी पहाटेच शहरात येत आहेत. कृषी केंद्राच्या दुकानांवर शेतकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागत आहे. मात्र, बियाणे लवकर मिळावे या हेतून शेतकरी रांग सोडून चहा पाण्याला जाऊ शकत नाहीत, ही अडचण ओळखून प्रहार शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना रांगेतच चहा, पाणी बिस्कीटचे वितरण केले. सध्या शेतकरी महाबीजचे सोयाबीन बियाणे खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर शेतकऱ्यांनी प्रहार संघटनेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.