अकोला -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामध्ये आता परत वीज दरवाढीची चर्चा सुरू आहे. ही वीज दरवाढ मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वीज दरवाढ संदर्भात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना आज विचारणा केली असता, त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, वीज दरवाढ हा निर्णय राज्य सरकारचा नसून, याबाबत महावीज नियामक आयोगाकडून निर्णय घेण्यात येतो.
पारस येथील औष्णिक प्रकल्प पाहण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना वीज दरवाढी संदर्भात प्रतिक्रिया दिली. पुढे ते म्हणाले, महावीज कंपनीचा आगामी खर्च, आधी झालेला खर्च, थकबाकी या सर्व गोष्टींचा विचार करून आयोगाकडून वीज दरवाढीचा निर्णय घेतला जातो. यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या वीज दरवाढीचे संकेत दिले आहेत.