अकोला -महाबीजच्या आज असलेल्या ऑनलाईन वार्षिक आमसभेत सहभागी न होता अधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे भेटून प्रश्न विचारायचे असणाऱ्या भागधारक शेतकऱ्यांना महाबीजच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी रोखले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.
काय आहे प्रकरण?
महाबीज दरवर्षी वार्षिक आमसभा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात घेत असते. परंतु, यावर्षी कोरोनामुळे ही सभा ऑनलाईन घेण्यात येणार असल्याचे महाबीज प्रशासनाने भागधारकांना आधीच सूचना दिली. तसेच त्यांना वार्षिक खर्चाचा अहवाल ही दिला आहे. वार्षिक आमसभेला निर्धारित वेळेवर ऑनलाईन सुरुवात झाली. या सभेत काही शेतकरी सहभागी झाले असले तरी दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी महाबीज कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, महाबीज प्रशासनाने आधीच प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त ठेवल्याने भागधारक शेतकऱ्यांना आत जाता आले नाही. परंतु, काही भागधारक शेतकऱ्यांना प्रशासनाच्या मंजुरीने पोलिसांनी आत सोडले. दरम्यान, काही शेतकरी हे प्रवेशद्वारासमोर उभे होते.