अकोला- पिवंदळ खुर्द ते नांदखेड या दरम्यान पक्का रस्ता बांधण्यात यावा या मागणीसाठी पिवंदळ खुर्दच्या विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याच्या समस्येबाबत आपली कैफियत मांडली.
तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ खुर्द ते नांदखेड हा तीन किलोमीटर रस्ता कच्चा आहे. हा रस्ता बांधण्यात यावा यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने लोकप्रतिनिधींकडे निवेदने देऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले होते. पिवंदळ खुर्द हे गाव हागणदारीमुक्त झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ग्रामस्थांना रस्ता बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हा रस्ता अद्यापही बांधण्यात न आल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच नागरिकांनाही प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.