अकोला -शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन आज पहाटे फुटली होती. अग्रेसन चौक येथे ही पाईपलाईन फुटली. यामुळे पाण्याचे मोठे फवारे उडत होते. तसेच लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत होते. जवळपास पाच तास हा प्रकार सुरू होता. मात्र, मनपाकडून दुरुस्तीबाबत कुठलीच तातडीची कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली अग्रेसन चौकात सकाळी रस्त्याचे काम सुरू असताना शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. त्यामधून लाखो लिटर पाणी तासंतास वाहत होते. या पाईपलाईनमधून पाण्याचे मोठे फवारे उडाले. दरम्यान, या पाण्यामुळे रस्त्यावर पाणीचपाणी वाहत होते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते साचले होते. हे पाणी जवळपास दीड किलोमीटरपर्यंत रस्त्यावर वाहत होते.
पाच ते सहा तास हे पाणी पाईपलाईनमधून निघत होते. या दरम्यान, मनपाकडून पाईपलाईन दुरुस्तीबाबत कुठलीच पावले उचलण्यात आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. मनपाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या पाईपलाईनवरील परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणे शक्य होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. संबंधित कंत्राटदारावर मनपा प्रशासन नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.