अकोला - देशात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीतील निर्भया त्यानंतर हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानतंर घटनांना आवर घालणे गरजेचे असून या देशामध्ये महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत शनिवारी शहरात युवतींनी मोर्चा काढला.
हेही वाचा -चुनाभट्टी येथे मद्यधुंद कार चालकाची पादचाऱ्यांना धडक; 19 वर्षीय तरूणीचा मृत्यू
शहारातील विविध सामाजिक संस्थाच्या वतीने निघालेला हा मोर्चा अशोक वाटिका येथून मार्गस्थ होत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. या परिसरात आल्यानंतर हैदराबादमधील प्रकरणातील महिला पशुवैद्यकीय पीडितेला श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना निवेदन देण्यात आले.
निर्भया खरंच निर्भय झाली आहे का? मोर्चात महिलांचा आर्त टाहो वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सक्षम प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी युवतींच्या वतीने करण्यात आली. तक्रार नोंदण्यासाठी क्षेत्राची सीमा नसावी, झिरो एफआयआर प्रणाली देशभरातील पोलीस यंत्रणेने राबवावी, आरोपींना अटक करणे व तपासामध्ये विलंब होणार नाही, अशी व्यवस्था असावी, अत्याचाराची सर्व प्रकरणे जलदगतीने चालविण्यात यावी, निकालासाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागू नये, अत्याचार प्रकरणातील आरोपींना राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याची मुभा असू नये, यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.