अकोला- गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी (११ सप्टेंबर) जिल्ह्यात हजेरी लावली. मात्र, त्यानंतर परत ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू राहिला. मात्र, वातावरणाच्या या लहरीपणामुळे अकोलेकरांना उष्णतेची झळ बसत आहे. अकोल्याचा पारा ३५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला असल्याने नागरिकांना सप्टेंबरमध्येच 'ऑक्टोबर हीट'चा अनुभव येत आहे.
ऑगस्ट महिन्याच्या मध्यात आठ ते दहा दिवस पावसाची हजेरी होती. त्यानंतर पावसाने दडी मारली. ती थेट शुक्रवारी (११ सप्टेंबर) दुपारपर्यंत. शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर अकोल्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. २ सप्टेंबरपासून तापमान ३३.४ अंशावरून थेट दुसऱ्या दिवशी ३५.२ अंशावर पोहोचले. ९ सप्टेंबरला तापमान ३५.८ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे पारा खाली येत थेट ३३.६ अंशावरून तो काल ३४.१ अंशावर आला होता. मात्र, यात उन्हाची दाहकता कमी झालेली नाही. त्यामुळेच अकोलेकरांना सप्टेंबरमध्ये 'ऑक्टोबर हिट'चा अनुभव येत आहे.