अकोला - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस झपाट्याने वाढणारी संख्या ही चिंताजनक ठरत आहे. मात्र, त्याहुन अधिक चिंताजनक बाब म्हणजे सरकारने दिलेल्या नियमांचे शहरातील सार्वजनिक ठिकाणी कुठल्याच प्रकारचे पालन होत नसल्यामुळे कोरोनाचा धोका अधिक बळावला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील भाजीबाजारात आज(रविवार) पहाटे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. या गर्दीतील अनेक नागरिकांनी तोंडावर मास्कही नव्हते लावले. सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमांचा पूर्णपणे ते फज्जा उडाला. तसेच याठिकाणी प्रशासनाचा किंवा पोलीस कर्मचारीदेखील हजर नव्हता. त्यामुळे प्रशासनाचे नियोजन अकोला येथील कोरोना रुग्ण वाढीसाठी पूरक ठरत आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अकोल्याची कोरोना रुग्णांची संख्या बाराशेच्या जवळ पोहोचली आहे. दोन अंकाने वाढणारी रुग्णांची संख्या ही अकोलेकरांसाठी चिंताजनक बाब ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाने सम-विषम पद्धतीने व्यवसाय करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी या सूचना कचऱ्याच्या पेटीत टाकून दिल्या असून कुठल्याच प्रकारचा आदेश त्यांनी पाळलेला नाही. त्यासोबतच भाजी विक्रेत्यांना एका ठिकाणी भाजी विक्री न करता त्यांना नेमून दिलेल्या परिसरात व गल्लीमध्येच भाजीविक्री करावी लागणार असल्याच्या नियमांचाही भाजी विक्रेत्यांनी फज्जा उडवला आहे.