अकोला -कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दुष्टीने आरोग्य विभागाकडून तयारी करण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेत सर्वात जास्त धोका हा लहान मुलांना असल्याचे बोलल्या जात असल्याने त्यासाठी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात लहान मुलांसाठी पेडियट्रिक टास्क फोर्स तयार करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक (डीडी) डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.
'सध्या तपासणी ही कमी झाल्या आहेत' -
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला होता. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर वाढल्याने त्याचा ही पुरवठा रुग्णांना करण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली होती. त्यामुळे या लाटेत रुग्णांच्या मृत्यूची संख्या जास्त प्रमाणात वाढली होती. तर दुसरीकडे या लाटेत लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारचे निर्बंध लावण्यात आले होते. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून मृत्यूदरही कमी झाला आहे. तरीही प्रशासनाकडून रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासोबत संसर्ग होणाऱ्या ठिकाणी गर्दी होवू नये, याची काळजी घ्यावी, असे आदेश शासनाने दिले आहे. सध्या तपासणी ही कमी झाल्या आहेत. तसेच लसीकरण ही वाढले आहे.