अकोला- कोरोनाबाधितांवर उपचारात कृत्रिम प्राणवायू सध्या मोठी भूमिका बजावत आहे. मध्यंतरी राज्यात कृत्रिम प्राणवायूचा तुटवडा भासत होता. राज्याच्या तुलनेत जिल्ह्याची स्थिती सुद्धा वेगळी नव्हती, कारण जिल्ह्यातील रुग्णांसाठी ६ हजार ७५१.५८ क्यूबिक मीटर कृत्रिम प्राणवायूची आवश्यकता होती. परंतु, आरोग्य विभागाकडे केवळ ६ हजार ३०० क्यूबिक मीटरच प्राणवायू उपलब्ध होता. म्हणजेच ४५१.५८ क्यूबिक मीटर प्राणवायूचा जिल्ह्यात तुटवडा होता. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील तीन ठिकाणी प्रत्येकी दहा किलोचा 'लिक्विड प्लॉन्ट' उभा राहत आहे. यामुळे कोरोनाच नव्हे इतरही रुग्णांसाठी तातडीने प्राणवायू (ऑक्सिजन) पुरविणे शक्य होणार आहे.
देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोनामुळे बाधित रुग्णांमध्ये प्राणवायूचे प्रमाण कमी होत असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने अभ्यासातून व्यक्त केला आहे. त्यामुळे या रोगाने ग्रस्त असलेल्यांना औषधोपचाराचा एक भाग कृत्रिम प्राणवायू देण्यात येत आहे. परंतु, राज्यात मोठ्या प्रमाणात प्राणवायूची मागणी वाढत असल्याने त्याचा तुटवडा भासत होता. काही ठिकाणी तर रुग्णांना कृत्रिम प्राणवायू पुरवठा न झाल्याने ते दगावल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सर्वच जिल्ह्यांना कृत्रिम प्राणवायूचा मुबलक साठा तयार ठेवण्याच्या सूचना त्यावेळी केल्या होत्या. त्यामुळेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय, मूर्तिजापूर सामान्य उपजिल्हा रुग्णालय येथे प्रत्येकी एक या प्रमाणे तीन 'ऑक्सीजन प्लॉन्ट' तयार करण्यात येत आहेत.