अकोला - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला म्हणून राज्यात ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यात यंदा मतदारांनी कोणाला कौल दिला हे २४ तारखेला समोर येणार आहे. या जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात तिरंगी लढत झाली आहे. २१ ऑक्टोबरला झालेल्या मतदानात जिल्ह्यात ५६.८८ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१४ च्या तुलनेत (६१.२० टक्के) साधारण पाच टक्क्यांनी मतदान घसरले आहे. अॅड. आंबेडकरांचा बालेकिल्ला म्हटले जात असले तरी, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत येथील पाच पैकी चार मतदारसंघात भाजपने विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली होती.
२८ - अकोट विधानसभा मतदारसंघ
अकोट विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीमध्ये ६०.७८ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीत अकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या प्रकाश भारसाखळे यांनी ७० हजार ०८६ एवढी मते घेत काँग्रेसच्या महेश गणगणे यांचा ३१ हजार ४११ मतांनी पराभव केला होता. गणगणे यांना ३८ हजार ६७५ इतकी मते मिळाली होती. २०१४ च्या विधानसभेला सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. परंतू यंदाची परिस्थिती वेगळी आहे. यावेळी महायुतीकडून भाजपचे प्रकाश भारसाखळे पुन्हा नशिब आजमावत आहेत. तर यंदा आघाडीकडून काँग्रेसच्या संजय बोडके यांना संधी देण्यात आली आहे. तर संतोष रहाटे वंचित कडून आणि रविंद्र फाटे हे मनसे कडून लढत आहेत. २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का वाढला असून यंदा ६३.८३ टक्के इतके मतदान झाले असून या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे पहावे लागेल.
२९ - बाळापूर विधानसभा मतदारसंघ
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाळापूर मतदारसंघात ६०.२८ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीत बाळापूर विधानसभा मतदारसंघातून भारीपच्या बळीराम सिरसकर यांनी ४१ हजार ४२६ एवढी मते घेत काँग्रेसच्या सईद नतीकुद्दीन खतीब यांचा ६ हजार ९३९ मतांनी पराभव केला होता. खतीब यांना ३४ हजार ४८७ मते मिळाली होती. २०१९ विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने येथून सेनेच्या नितिन तळे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम गावंडे यांचे आव्हान आहे. वंचितकडून डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि एमआयएम कडून रहेमान खान लढत देत आहेत. २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का वाढला असून यंदा ६३.०० टक्के इतके मतदान झाले असून या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे पहावे लागेल.