अकोला -संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करायला हवी. ते आता 138 ब आणि 342 या ओबीसींच्या कलमाची मागणी करीत आहे. संभाजीराजे हे स्पष्टपणे ओबीसींचे आरक्षण मागत नाही. पण ओबीसीमध्ये येण्यासाठी कलमांची मागणी करीत आहे. संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचे वारसदार आहेत. त्यांनी छत्रपतींच्या विचारांचे पण वारसदार व्हावे, असा खोचक टोला ओबीसी जनमोर्चाचे नेते माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी लगावला आहे. केडीया प्लॉट येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'संभाजीराजेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी'
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाची पुनर्विचार याचिका खारीच केली आहे. त्यामुळे मराठा समाजाची पुनर्विचार याचिकेचा विषय संपलेला आहे. काही नेते म्हणतात, की आता आम्हाला ओबीसी घ्या. परंतु आता ओबीसीचा मार्ग जो आहे, तो 102 घटनादुरुस्तीने लॉक केलेला आहे. आता एखाद्या जमातीला ओबीसीमध्ये यायचे असेल तर 138 ब आणि 342 अ नुसार दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. संभाजीराजे जी भूमिका मांडत आहेत ते म्हणतात 138 ब आणि 342 अ आरक्षण द्या, असे म्हणत नाही कि आम्हाला ओबीसीत घ्या. 138 ब आणि 342 अ कलम आहेत ते ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आहे. संभाजीराजे यांना माझे आव्हान आहे, की तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्हाला नक्की काय करायचे आहे. मराठा समाजाला ओपनमध्ये आरक्षण घ्यायचे आहे, की ओबीसीत आरक्षण हवयं, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मागासवर्गीयांची सर्व प्रक्रिया मराठा समाजाला करायला लावणे आहे. त्यांच्या भविष्याशी खेळण्यासारखे होईल. त्यांना सगळ्यात सोपा मार्ग आहे, की ईडब्ल्यूएस जे मराठ्यांना उपलब्ध आहे. तुम्ही राजे आहात. तुमचे केंद्रात वजन आहे. तुम्ही तिथे जा, पंतप्रधान मोदींना भेटा, घटना दुरुस्ती करा, आणखीन पाच टक्के वाढ करा. तुम्ही पाटीदारांना सोबत घ्या. हे करण्याऐवजी तुम्ही ओबीसींचे जे कलम आहे, त्यांची मागणी करीत आहे, हे ओबीसींना मूळीच मान्य नाही, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे ते वारसदार आहेत. त्यांनी महाराजांच्या विचारांचे वारसदार व्हावे, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला. जो बहुजन समाज आहे, तो सुद्धा महाराष्ट्राचा घटक आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात मावळ्यांनी रक्त सांडलेले आहे. त्यांचे जे आरक्षण आहे ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा संभाजीराजे यांची आहे, असेही ओबीसी जनमोर्चाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे म्हणाले.
हेही वाचा -'राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान सुरू आहे'