अकोला -महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सिंग संघटनेच्या आरोग्य सहायिका व आरोग्य सेविका यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस होता. या आंदोलनात परिचारिकांनी राज्य सरकारचा व जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलन मंडपातच होमहवन आंदोलन केले. त्यासोबतच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी यांची आंदोलन मंडपात बैठक झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली असल्याने संघटना आपल्या आंदोलनावर ठाम असल्याने आरोग्य विभागाची चांगलीच अडचण झाली आहे.
हेही वाचा -अकोल्यात गुन्हे शाखेकडून 500 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त, एका व्यक्तीला केली अटक
महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सिंग संघटनेचे आंदोलन विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे. या आंदोलनात दुसर्या दिवशी अनेक घडामोडी झाल्या. त्यामुळे, हे आंदोलन खूप चर्चेत राहिले. राज्य सरकार व जिल्हा परिषद प्रशासन परिचारिकांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करीत परिचारिकांनी आंदोलन मंडपातच प्रशासनाचा निषेध करण्यासाठी होमहवन केले. यावेळी राज्य सरकारच्या शासननिर्णयांचे दहन करण्यात आले. तर, दुसरीकडे प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. परिचारिकांवर अन्याय करण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
यासोबतच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आणि संघटनेमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये मात्र दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. परंतु, त्यातून निर्णय कुठलाच झाला नाही. शेवटी ही चर्चा निष्फळ ठरली. यामुळे संघटनेने हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाबाबत जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाही.