महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : बियाण्यांच्या थैलीवर अन् बिलावर शिक्के मारणाऱ्या गणेश कृषी सेवा केंद्राला नोटीस - कृषी सेवा केंद्रास नोटीस

सोयाबीन बियाण्यांच्या थैलीवर आणि बिलावर शिक्के मारणाऱ्या तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाला जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांनी आज नोटीस बजावली आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत' ने 3 जून रोजी वृत्त प्रकाशित करून हे प्रकरण उजेडात आणले होते.

notice-of-agriculture-department-to-ganesh-krishi-seva-kendra
notice-of-agriculture-department-to-ganesh-krishi-seva-kendra

By

Published : Jun 4, 2021, 4:23 PM IST

अकोला - सोयाबीन बियाण्यांच्या थैलीवर आणि बिलावर शिक्के मारणाऱ्या तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाला जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांनी आज नोटीस बजावली आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत' ने 3 जून रोजी वृत्त प्रकाशित करून हे प्रकरण उजेडात आणले होते. सोयाबीन बियाणे विकून स्वतःची जबाबदारी झटकणाऱ्या कृषी सेवा केंद्राचालकाला नोटीस बजावून त्याला 14 जून रोजी कृषी अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याने केंद्रचालकावर आता कारवाईची टांगती तलवार आहे.

कृषी अधिक्षकांनी कृषी केंद्रास बजावलेली नोटीस

सोयाबीन बियाण्यांबाबत गतवर्षीपासून वाद सुरू आहेत. उगवण क्षमता नसलेले बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार गतवर्षी उघडकीस आल्याने अनेक कंपन्यांवर कारवाईही झाली होती. त्यातून यावर्षी कंपन्या व बियाणे विक्रेत्यांनी अजब पळवाट काढून बियाणे विकणार, पण जबाबदारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. थेट बियाणे विक्रीच्या देयकावरच शिक्का मारून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न विक्रेते करीत आहेत. ‘सदर सोयाबीन बियाणे मी झाल्या जबाबदारीवर घेत आहे. तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईन’, असा शिक्का तेल्हारा तालुक्यातील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाने मारला आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारून त्याची कोणतीही जबाबदारी न घेण्यासारखा आहे. यातून उद्या जर बियाणे उगवलेच नाही आणि विकत घेतलेले बियाणे बोगस निघाले तर त्याची जबाबदारी कोणावर निश्चित करावी, हा प्रश्नच आहे.

बियाण्यांच्या बिलावर मारलेले शिक्के
दरम्यान, याबाबत ईटीव्ही भारत चॅनलने 3 जून रोजी वृत्त प्रकाशित करून जिल्हा कृषी अधीक्षक कांताप्पा खोत यांना आणि पालकमंत्री बच्चू कडू यांना विचारणा केली होती. त्यावर यासंदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यानुसार कृषी अधीक्षक यांनी गणेश कृषी सेवा केंद्र चालकास नोटीस बजावली आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी यांना संबंधित कृष्ण सेवा केंद्राचे रेकॉर्ड तपासणीचे आदेश दिले आहे. त्यासोबतच तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित गणेश कृषी सेवा केंद्रचालक यास 14 जून रोजी कृषी अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. बियाणे विकत घेणारा शेतकरीच यात फसवल्या जाण्याची भिती अधिक आहे. बियाण्यांची जबाबदारी संबधित कंपनीसोबतच विक्रेत्यांवरही समप्रमाणात राहिल्यास बोगस बियाणे विक्रीला आळा बसतो. मात्र, आता विक्रेत व बियाणे कंपनीच देयकांवर शिक्के मारून जबाबदारी झटकत असेल तर अशा व्यवहारात शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारले गेल्यास शेतकऱ्यानी नुकसान भरपाईसाठी कुणाचे द्वार ठोठावावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details