अकोला : केंद्रीय मंत्र्यांना नियमानुसार अटक करण्यासंदर्भात नियम आहेत. मात्र नारायण राणेंवर दाखल केलेले गुन्हे हे नियमांच्या बाहेरचे गुन्हे असल्याचे मत भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. अदखलपात्र गुन्हे दखलपात्र करून राणेंना अटक केल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
राणेंना अटक : अदखलपात्र गुन्हे दखलपात्र केल्याचा चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
अकोल्यातील खोलेश्वरमध्ये भाजयुमोच्या शाखेचे उद्घाटन करण्यासाठी आले असता बावनकुळे बोलत होते. शिवसेना आणि त्यांच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत भाजपच्या नेत्यांविषयी अश्लील भाषेत वक्तव्ये करण्यात आल्याची 50 उदाहरणे देता येतील. भाजपने कधीही यासंदर्भात राजकीय उत्तरे दिली नाही. जाळपोळ केली नाही असे म्हणतानाच ही महाराष्ट्राीच संस्कृती नाही असेही बावनकुळे म्हणाले. राज्यात जाणीवपूर्वक वातावरण खराब करणे किंवा बंगाल सारखं वातावरण तयार करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शांतपणेही मार्ग निघू शकतात असे बावनकुळे म्हणाले.
अमरावती भाजप कार्यालयात झालेल्या जाळपोळीबाबत ते म्हणाले, अमरावती भाजप कार्यालयात कुणी नसताना तिथे जाळपोळ करण्यात आली आहे. या निमित्ताने राज्यातील सर्वच कार्यालयांचे सरंक्षण करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्याचेही म्हणाले. यासंदर्भात अमरावती एसपींना भेटून गुन्हे दाखल करण्याची विनंती करू. आम्हाला अपेक्षा ही होती की उद्धवजींनी याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अपील करून त्यांना थांबवायला पाहिजे होते असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अशी केली अटक, बघा VIDEO