अकोला - एकीकडे जिल्हाधिकारी, पोलीस, मनपा, आरोग्य विभाग मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईसाठी रस्त्यावर उतरलेले असताना, दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा कुठलाच नियम पाळण्यात आला नाही. आरटीओ कार्यालय अधिकृत जागेत हलवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलनकरण्यात आले होते.
राज्य सरकार वेळोवेळी मास्क वापरा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे सांगत असून सामान्य जनतेवर कारवाई करत आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेतेही हे नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, अकोल्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असेच दिसत आहे. राज्य परिवहन विभाग हे अनधिकृत जागेत असून, ते अधिकृत जागेत हलवण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी आरटीओ कार्यालयात आंदोलन केले. हे आंदोलन करताना आंदोलकांनीच मास्क वापरले नाही. तसेच कुठलेही सोशल डिस्टन्सिंग ठेवले नाही. राज्याच्या सत्तेत असलेल्या पक्षाकडूनच नियमांचा भंग केला जात असेल तर सामान्य जनतेने 200 रुपयांचा दंड का भरावा?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.