अकोला :भाजपचा केवळ शिवसेनेच्या मतदार संघातील विकास कामांना विरोध असून, ६० टक्के काम झालेल्या ६९ गावे पाणी पुरवठा योजनेला स्थगिती देत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण केले, अशी टिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. राजकरण करून जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याच्या निषेधार्थ आपण मंगळवारी विधिमंडळाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण करणार असून, अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो ग्रामस्थ आदोलन करतील, अशी माहिती देत त्यांनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
पुरवठा योजनेला सरकारकडून स्थगिती : पुढे ते म्हणाले, बाळापूर व अकोला तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या व उद्धव ठाकरे यांची शिवसेना आग्रही असलेल्या ६९ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. या योजनेला वान प्रकल्पातून पाणी पुरवठा होणार असून, पाणी देण्याला तेल्हारा तालुक्यातील काही ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
ग्रामस्थांना तहानलेले ठेवले : वानमधून शेगाव, जळगाव जामोद येथेही पाणी पुरवठा होतो. मात्र, त्या ठिकाणी भाजपचा आमदार असून, बाळापूर येथे शिवसेनेचा आमदार असल्यानेच भाजपचे आमदार विरोध करीत आहेत. पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पाणी टंचाई निवारण्यासाठी बैठक घेणे आवश्यक होते. मात्र, हे करता त्यांनी तत्कालीन ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेलाच स्थगिती देत ग्रामस्थांना तहानलेले ठेवले आहे. स्वत:ला हींदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकराला ग्रामस्थ हे हींदू दिसत नाहीत काय, असा सवाल त्यांनी केला. पत्रकार परिषेदला माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, पूर्वचे अध्यक्ष राहुल कराळे, पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, विकास पागृत, उमेश जाधव आदी होते.