अकोला - कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोना संसर्गाचे निदान होण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा अकोल्यात नाहीत. त्यासाठी नमुने नागपूर येथे पाठवावे लागतात, शासनाने दिलेल्या तातडीच्या निधीतून येत्या १५ दिवसात ही प्रयोगशाळा उभारून कार्यान्वित करा, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज येथे जिल्हा प्रशासनास दिले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बच्चू कडू यांनी आज कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवहरी घोरपडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी निलेश अपार आदी उपस्थित होते.