अकोला - सध्या कांद्याला बाजारात मागणी वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा बाहेरच्या राज्यामध्ये विक्रीस गेला आहे. कांद्याचे भाव यावर्षी चांगले राहणार असल्याचा अंदाज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. अजूनपर्यंत कांद्याचे दर बाजारात पडले नसल्यामुळे भाववाढ राहील, या अपेक्षेने शेतकरी कांदा जमा करून ठेवत आहेत. बार्शीटाकळी या गावातील मोहन ढवणे यांनीही त्यांच्या 2 एकरातील 400 ते 500 क्विंटल कांदा शेतातच सध्या जमा करून ठेवला आहे. त्यांनाही दरवाढीची अपेक्षा आहे.
एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झालेली आहे. भाजीपाला उत्पादकांचा भाजीपाला विकला जात नाही. तर काही ठिकाणी या भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नाही. परिणामी, भाजीपाला उत्पादकांमध्ये याबाबत नाराजी निर्माण झालेली आहे. तर दुसरीकडे व्यापार्यांकडूनही कोरोनाच्या संकटामध्ये भाजीपाला घेण्यासाठी उत्सुकता दिसून येत नाही. त्यामुळे भाजीपाला विक्रेते, उत्पादक हे संकटात सापडण्याचा परिस्थितीत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा बाजारामध्ये विक्रीस उपलब्ध झाला आहे. सध्या कांद्याचे भाव 9 ते 12 रुपये किलोच्या घरात आहेत. आता कांदा उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कांद्याचे भाव 15 रुपयांच्या वर जाण्याची शक्यता कांदा उत्पादकांनी व्यक्त केली आहे. सध्या कुठल्याही वाणाला चांगला प्रतिसाद मिळत नसल्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये कांदा बाजारात विक्रीस उपलब्ध असला तरी या कांद्याला उठाव नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांना या परिस्थितीमध्ये दरवाढ होण्याची आस लागलेली आहे.