अकोला - 'ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तर, दुसरीकडे गावात गर्दी होत आहे. पण, यासंदर्भात सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामससेवक हे पोलीस आणि प्रशासनाला माहिती देत नसल्याचे समोर आले. त्यामुळे आता गावात गर्दी दिसल्यास सरपंचावर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्यावरही प्रशासकीय कारवाई करण्यात येईल', असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दिला आहे.
'ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच गावात अंत्यविधी, लग्नसमारंभ आदी कार्यक्रम होत आहेत. बऱ्याचवेळा कार्यक्रमाची परवानगी नसते. तसेच परवानगीच्या कार्यक्रमात परवानगीपेक्षा जास्त नागरीक सहभागी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. अशा कार्यक्रमात मास्क न वापरणे, सॅनिटायझर न ठेवणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे असे प्रकार दिसून आले आहेत. याबाबत तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्याकडून कुठलीही माहिती प्रशासनाला देण्यात येत नाही. यामुळे कोरोना रुग्ण वाढत आहेत', असेही नीलेश अपार यांनी म्हटले.