अकोला -विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अकोला जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांनी नुकसानग्रस्त भागात धाव घेतली. मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे.
अकोल्यातील नवनिर्वाचित आमदारांची शेतात धाव
पावसामुळे शेतातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. कापाशीची बोंडे ओली होऊन काळी पडली आहेत. शेतमालाचे नुकसान झाल्याने ऐन दिवाळीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार नितीन देशमुख, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे यांनी कृषी अधिकारी व कर्मचार्यांना दिले.
हेही वाचा - 'पावसात भिजावं लागतं, आमचा अनुभव कमी पडला'
नवनिर्वाचित आमदारांनी आपापल्या विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतीचा तत्काळ सर्वे करून त्याचे पंचनामे तयार करण्याचे आदेश आमदारांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले. तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ देण्याच्या सूचनाही दिल्या.
संयुक्त पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे महसूल व कृषी विभागाच्या गाव पातळीवरील अधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामे करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यानंतर मंडळ, तालुका व जिल्हास्तरीय अहवालही लगेच सादर करावे, असेही पापळकर यांनी सांगितले.