अकोला - राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंगपटूने अकोला येथील क्रीडा प्रबोधिनी कक्षामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रणव राऊत असे आत्महत्या करणाऱ्या बॉक्सिंगपटूचे नाव आहे. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी घडली.
बॉक्सिंगपटू प्रणव राऊतची आत्महत्या हेही वाचा -भारताचा डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझा क्रिकेटमधून निवृत्त
प्रणव प्रशिक्षणासाठी नागपूर येथून अकोल्यात आला होता. राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रणव तयारी करत होता. या स्पर्धेच्या तयारीसाठी नागपूर येथून काही बॉक्सिंगपटू क्रीडा प्रबोधिनी येथे आले होते. मात्र, खेळ सुरू होण्यापूर्वी कक्ष क्रमांक ४ मध्ये पलंगावरील असलेल्या चादरीने पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
या घटनेची माहिती क्रीडा प्रबोधिनी मुख्याध्यापक सतीश भट यांना कळताच त्यांनी रामदासपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रणव राऊत याला सर्वोपचार रुग्णालयात पाठवले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेमागे कारण अस्पष्ट असले तरी त्याच्या जाण्यामुळे क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंमध्ये खळबळ उडाली आहे. क्रीडा प्रबोधिनीमधील ही पहिलीच घटना असून प्रणव राऊत यांचे वडील हे नागपूर येथे पोलीस विभागात कार्यरत असल्याचे समजत आहे.