अकोला: आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी नागपूर येथून अकोल्यातील शासकीय विश्रामगृह परिसरात सोडले होते. दरम्यान, यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. त्यांचे जल आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव असल्याचेही देशमुख म्हणाले. राज्य शासनाने आपल्या बळाचा दुरुपयोग केल्याचाही आरोप देशमुखांनी केला. नागपूरची ही जलयात्रा राज्य शासनाने मोडून काढली असली तरी पुढच्या टप्प्यात खारपान पट्ट्यातील पाणी घेऊन दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालू:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर 'जश्याच तसे' उत्तर देण्याची धमकी दिली असली तरी आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालू, असे वक्तव्य नितीन देशमुख यांनी केले. ज्या पद्धतीने राज्य शासनाने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, हा प्रकार म्हणजे दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यासारखे होते. आम्ही नागरिकांचे प्रश्न घेऊन गेलो होतो. उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या भावना ऐकून आमच्याशी संवाद साधायला हवा होता; मात्र त्यांनी ज्या पद्धतीने हे आंदोलन दपण्याचा प्रयत्न केला आहे, ही हुकूमशाही पद्धत आहे. याबाबत आम्ही कायदेशीर बाबींचा आधार घेऊन हे आंदोलन पुन्हा करू, असेही ते म्हणाले. परत वान धरणाच्या पाणीवरील स्थगिती उठवण्याची मागणी आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यात केली आहे.