अकोला - दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लीम युनायटेड फोरमने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. केंद्रसरकारने तयार केलेल्या नवीन कृषी कायद्याला विरोध दर्शविण्यासह शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फोरमच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभाग नोंदवला. तसेच शेकडो कार्यकर्त्यांना संबोधितही केले.
शेतकरी आंदोलनाला अकोल्यातील मुस्लीम युनायटेड फोरमचा पाठिंबा शेतकऱ्यांचे मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत पाठीशी-
केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे तयार केले आहेत. या कृषी कायद्याला देशभरामध्ये विरोध आहे. दिल्ली येथे अनेक राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करीत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आहेत. मात्र, केंद्र सरकार त्यांचे कायदे रद्द करीत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील मुस्लिम युनायटेड फोरमने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले आहेत.
या धरणे आंदोलनामध्ये शेकडो पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचे मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत फोरम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याच दृष्टिकोनातून हे धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
मुंबईत ही धडकला किसान सभेचा मोर्चा-
आज मुंबईतील आझाद मैदानातही शेतकरी मोर्चा येऊन धडकला आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या इतर प्रमुख मागणीसाठी शेतकरी आज राजभवनाला घेराव घालणार आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, यासह इतर संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.