अकोला - जागेच्या वादातून एक युवकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. अकोट तालुक्यातील पळसोद येथे आज (मंगळवारी) दुपारी घडली. किसन पूर्णाजी पाटेकर, असे मृताचे नाव आहे. अकोला जिल्ह्यात हत्यांची मालिका सुरूच असून नऊ दिवसांत हा आठवा खून झाला आहे.
अकोल्यात जागेच्या वादातून एकाची हत्या; तिघांना अटक
दहीहांडा पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या पळसोद येथील शेजारी राहणाऱ्या पाटेकर कुटुंबांमध्ये जागेवरून वाद सुरू होता. सागर गणेश पाटेकर व लखन पूर्णाजी पाटेकर यांच्यामध्ये जागेवरून वाद झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दहीहांडा पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या पळसोद येथील शेजारी राहणाऱ्या पाटेकर कुटुंबांमध्ये जागेवरून वाद सुरू होता. सागर गणेश पाटेकर व लखन पूर्णाजी पाटेकर यांच्यामध्ये जागेवरून वाद झाला. वाद वाढत असल्याने किसन पूर्णाजी पाटेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सागर गणेश पाटेकर, रवी गणेश पाटेकर, गणेश पूर्णाजी पाटेकर यांनी किसन पाटेकर व लखन पाटेकर यांना फावड्याने मारहाण केली. यामध्ये दोन्ही भावंडे गंभीर जखमी झाले.
दोघांनाही दहीहांडा पोलिसांनी तातडीने अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी किसन पाटेकर यास मृत घोषित केले. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी सागर गणेश पाटेकर, रवी गणेश पाटेकर, गणेश पूर्णाजी पाटेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे, हेकॉ दयाराम राठोड, पोकॉ सुभाष वाघ, विजय सावदेकर करत आहेत.