अकोला Akola Murder Case: बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील तरोडा येथील विशाल हा खाजगी कोचिंग क्लासमध्ये शिकवणी घेत होता. तो कृषी नगर परिसरात त्याच्या काही मित्रांसह भाड्याने खोली करून राहत होता. सोमवारी रात्री कृषी नगर परिसरातील युवकांनी त्याच्याशी वाद घालून त्याच्यावर शस्त्राने वार केला. त्यात विशाल गंभीर जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. तेथील काही नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या विशालला सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं. मात्र, प्रचंड रक्तस्त्राव झाल्यानं डॉक्टरांनी विशालला मृत घोषित केलं.
अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल : घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके आपल्या ताफ्यासह दाखल झाले होते. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत यामध्ये साहील आठवले, राहूल तायडे, मंगल चव्हाण यांना ताब्यात घेतलं आहे, तिघे ही कृषी नगरात राहतात.