अकोला - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज (सोमवार) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कर विरोधात दिलेल्या निर्णयावर चर्चा सुरू होती. यावेळी माजी महापौर विजय अग्रवाल, शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा आणि विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण हे आमने-सामने आले आणि या तिघांच्या वादामध्ये प्रशासनाची गोची झाली. दरम्यान, हा विषय महापौर अर्चना मसने यांनी मंजूर केला असल्याचे जाहीर करत यावरील चर्चेला पूर्ण विराम दिला.
घरकर वाढ ही बेकायदेशीर असून ही करवाढ कोणत्या नियमाने केली यासंदर्भात उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात प्रश्न विचारला आहे. याबाबत काँग्रेसचे नगरसेवक डॉ. जीशान हुसेन हे सभागृहात बोलत असताना त्यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या करवाढीसंदर्भातील पुराव्यांमध्ये माझी व माझ्या पत्नीची वैयक्तिक करभरणा संदर्भातली माहिती महापालिकेने सादर केल्याचा उल्लेख केला. यानंतर काँग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी हा प्रकार निंदनीय असून याबाबत सभागृहाने महापौरांच्या करभरणा संदर्भातली माहिती का सादर केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला. यावर माजी महापौर विजय अग्रवाल यांनी आक्षेप घेतला, आणि त्या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.