अकोला- मूर्तिजापूर तालुक्यात येणाऱ्या कुरुम बस स्थानकावर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात वृद्ध दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर घडली. यात गंभीर जखमी वृद्ध दुचाकीस्वाराचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; कुरुम बसस्थानकावरील घटना
बिहारीलाल गुजर हे कुरुम येथून बँकेचे काम आटोपून दुचाकीवरुन महामार्ग ओलांडुन घरी परत जात होते. यावेळी अकोल्याकडून अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गुजर यांचा मृत्यू झाला.
कुरुम रेल्वे स्टेशन येथील रहिवासी बिहारीलाल दशरथ गुजर हे कुरुम येथून बँकेचे काम आटोपून दुचाकीवरुन (एमएच - २७ - एस - २२४४) महामार्ग ओलांडून घरी परत जात होते. यावेळी अकोल्याकडून अमरावतीकडे जाणारा ट्रकने (सिजी - ०४ - जेसी - ४५५९) भरधाव वेगाने येऊन दुचाकीला धडक दिली. यामुळे गुजर दुचाकीसह खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर इजा होऊन रक्तस्राव झाला. यावेळी गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली
गंभीर जखमी झालेल्या गुजर यांना सामाजिक कार्यकर्ते मनीष महाजन यांच्या खासगी वाहनाने उपचाराकरिता अमरावती येथील इर्विन रुग्णालयात हलवले. यादरम्यान त्यांना रस्त्यातच रक्ताची उलटी झाली. रुग्णालय गाठून उपचार सुरू होण्यापूर्वीच बिहारीलाल यांची प्राणजोत मालवली. अद्यापपर्यंत माना पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. बिहारीलाल गुजर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.