अकोला - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने ‘लॉकडाऊन’ केले आहे. २० दिवसांनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याची तीव्रता सांगणारा प्रकार अकोल्यात घडला. तुलंगा गावातील एक महिला आणि तिची मुलगी मुलीच्या खात्यात जमा झालेले एक हजार रुपये काढण्यासाठी २० किमी पायी चालत गेल्या.
लॉकडाऊन वाढल्याने ग्रामीण भागातील मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. चार दिवसांपासून मोफत मिळालेल्या तांदळावर दिवस काढत असलेल्या तुलंगा येथील आशाबाई वाघमारे यांच्या मुलीच्या खात्यात विद्यार्थिनी प्रोत्साहन भत्त्याचे एक हजार रुपये जमा झाले. घरात अन्नाचा कणही नसल्याने आशाबाई १२ वर्षीय मुलीला घेऊन शुक्रवारी सकाळी वाडेगावला जाण्यासाठी निघाल्या. तुलंगा बसस्थानकावर वाहन नसल्याने दोघींनी पायीच वाडेगाव गाठण्याचा निर्णय घेतला.