अकोला- जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया 15 जानेवारीला होणार आहे. त्यामध्ये संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील 4 लाख 86 हजार 291 मतदार मतदान करतील. मतदारांमध्ये 2 लाख 53 हजार 36 पुरूष व 2 लाख 33 हजार 252 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता ग्रामीण भागातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवार राजकीय पक्षांचे तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
चार लाख 86 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क कोरोनामुळे झाल्या होत्या निवडणुका रद्द
राज्यासह जिल्ह्यातील एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च, 2020 रोजी मतदान होणार होते. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्च, 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता.
जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीसाठी होणार निवडणूक
आता डिसेंबर, 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
14 डिसेंबरला प्रसिद्ध झाल्या मतदार याद्या
या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या 1 डिसेंबर, 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर, 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर, 2020 रोजी संबंधित तालुक्यांचे तहसीलदार व तालुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली. त्यानुसार निवडणुकीत 4 लाख 86 हजार 291 मतदार मतदान करतील.
तीन इतर मतदरांचा समावेश
225 ग्रामपंचायतींसाठी 4 लाख 86 हजार 291 मतदार मतदान करतील. त्यामध्ये 3 इतर मतदारांचाही (तृतीय पंथी) समावेश आहे. हे मतदार तेल्हारा, अकोला व बार्शीटाकळी तालुक्यातील प्रत्येकी एक रहिवासी आहेत.
71 निवडणूक निर्णय अधिकारी
अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे काम सुरळीतपणे पार पडावे यासाठी 71 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यात 8, अकोट 7, मूर्तिजापूर 19, अकोला 10, बाळापूर व अकोला प्रत्येकी 10, बार्शीटाकळी 8 व पातूर तालुक्यातील 9 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा -कायमची दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडूंच्या कार्यालयात महिलांचा ठिय्या
हेही वाचा -शिक्षण संस्था संचालकांनी केली शासनाच्या जीआरची होळी; जिल्हाधिकाऱ्याना दिले निवेदन