अकोला - कापूस खरेदी सुरू करण्यात यावी यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली. यामध्ये कापूस खरेदी केंद्रांपैकी किती केंद्र सुरू झाले? आणि जे बंद आहेत ते का सुरू झाले नाही? यावर चर्चा करण्यात आली. तसेच त्यांनी खासदार अरविंद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांच्यासोबत बोलून निर्णय घेण्यात येईल, असे खासदार सावंत म्हणाल्याचे देशमुख यांनी सांगितले.
बैठकीत भारतीय कापूस निगम (सी.सी.आय.)चे विभागीय व्यवस्थापक अजयकुमार व जिल्हा निबंधक डॉ. प्रवीण लोखंडे हे उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये मान्य असलेले सर्व कापूस खरेदी केंद्र दोन दिवसाच्याआत सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. अकोला तालुका चिखलगाव, निंबी, आपातापा, बाळापुर, पारस, अकोट, तेल्हारा हिवरखेड, मूर्तिजापूर येथे असे एकूण १३ सीसीआयचे केंद्र आहेत. पैकी मूर्तिजापूर वगळून १२ केंद्र दोन दिवसांत सुरू होतील. सद्यस्थितीत फक्त दोनच केंद्र सुरू असल्याचे चर्चेत निष्पन्न झाले. शेतकऱ्यांचा सर्व प्रकारचा कापूस एकाच ग्रेडमध्ये खरेदी करण्यात यावा, असेही आमदार देशमुख म्हणाले.