अकोला - कोकण, चिपळूणच्या आधी महाराष्ट्रात अकोल्यात सर्वात जास्त मदत देण्यात आले असा दावा पालकमंत्री बच्चू कडू यांनी पणोरी गावात पत्रकरांशी बोलतांना केला आहे. अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथे पूरग्रस्तांना साहित्याचे वितरण आणि पणोरी गावातील पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या घरी कडू यांनी आज भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
'या' गावाला दिली भेट
अकोट तालुक्यातील आसेगाव या गावाला पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांची घरे वाहून गेली. तसेच घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेले. अशा पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू हे अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार आणि पणोरी गावातील मुरलीधर आनंदा बुटे हे पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी आणि मदतीचा धनादेश देण्यासाठी पालकमंत्री या दोन गावांच्या दौऱ्यावर होते. आसेगाव बाजार येथील पूरग्रस्तांना मदत केल्यानंतर ते पूनोरी गावात मुरलीधर बुटे यांच्या मुलाला भेटले. तिथे त्यांनी तलाठी व तहसीलदार यांना या कुटुंबाला शक्य तेवढी मदत करण्याचे आदेश दिले. तर बुटे यांच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च पालकमंत्री कार्यालय करणार, असेही त्यांनी सांगितले.
'भरीव मदत दिली जाणार'
यावेळी मंत्री बच्चू कडू म्हणाले, की राज्यात कोकण, चिपळूण येथे मोठी हानी झाली आहे. मात्र, तिथे अजून मदत मिळाली नाही. त्यापूर्वी महाराष्ट्रात अकोल्यात सर्वात आधी पूरग्रस्तांना भरीव मदत देण्यात आली आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील चार जण वाहून गेले. त्यांना चार लाखांची मदत दिली. मदत दिली असली तरी माणूस परत येणे नाही. पैशाने दुःख झाकल्या जात नाही. त्यांना यासह गोपीनाथ मुंडे विमा योजना, राष्ट्रीय आपत्तीचा निधी, घर पडले म्हणून पाच ते सात लाखांची मदत करणार आहोत, असेही पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले.