अकोला - अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी अकोला तालुक्यातील म्हैसपूर फाटा येथे पाहणी केली. मात्र, मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांशी व्यवस्थितपणे संवाद साधणे शक्य झाले नाही आणि त्यांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला. त्यामुळे हा ताफा गेल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी म्हैसपूर फाट्यावरच ठिय्या दिला. नंतर या शेतकऱ्यांची आमदार रणधीर सावरकर यांच्यासह भाजप लोकप्रतिनिधींनी समजूत काढली.
नियोजनानुसार वाशिम रोडवरील म्हैसपूर फाटा येथे शेतकरी खराब झालेले पीक घेऊन आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचा ताफा जाताना थांबला नाही, त्यामुळे नाराजी व्यक्त करीत शेतकरी तेथेच बसले. मात्र, मुख्यमंत्र्यांचा ताफा परतीच्या प्रवासाकडे निघाला, तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा म्हैसपूर फाट्यावर थांबविला आणि सोयाबीन, कपाशी हातात घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच अतिवृष्टीमुळे शेतीचे कसे नुकसान झाले हे देखील सांगितले, यावर आपले म्हणणे शांतपणे मांडा, असे भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांना सुचवले. तर मुख्यमंत्र्यांनीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र, ते शक्य न झाल्याने हा ताफा पुढे निघाला.