अकोला- मुंबई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत मनुताई कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थिनी आता अमेरिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या विद्यार्थिनींनी 'मनुताई किट्स एंजल' नावाने रोबोटिक्सचे प्रशिक्षण घेत 'सिटी शेपर' या थीमवर मॉडेल तयार केले होते. त्यांचे हे मॉडेल देशातून प्रथम आले आहे. मुंबईहून परतलेल्या या मुलींची आज(सोमवारी) शहरातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मुलींचे अभिनंदन केले.
राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत मनुताई कन्या शाळेतील विद्यार्थिनींची बाजी हेही वाचा -पंजाबराव देशमुख यांनी उभारलेल्या संस्थेचा लौकिक निर्माण करणे आपले काम - डॉ. विठ्ठल वाघ
मनुताई कन्या शाळा ही विदर्भातील सर्वात जुनी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली शाळा आहे. किट्स (काजल इनोव्हेशन टेक्निकल सोल्युशन) संस्थेच्या सामाजिक विभागाच्या वतीने राष्ट्रीय रोबोटिक्स तंत्रज्ञान स्पर्धेच्या 'फर्स्ट लिग्यु लीगच्या' निमित्ताने शाळेतील मुलींनी तयारी सुरू केली होती. मुली रोज रोबोटिक्सवर आधारित यंत्रणांशी एकरूप होऊन नवनवीन प्रयोग करत होत्या. या स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करणारी ही मुलींची पहिलीच बॅच होती.
मनुताई कन्या शाळेतील माजी विद्यार्थिनी काजल राजवैद्य या आंतरराष्ट्रीय स्तरावर रोबोटिक्स प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. रोबोटिक्स प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील प्रमुख समस्या कशा दूर करता येतील? यासाठी यावर्षीच्या स्पर्धेच्या थीमवर सर्व मॉडेल्स विद्यार्थिनींनी तयार केले. यामध्ये शहरातील स्वच्छता, वाहतूक, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घरांचे स्थलांतर, रुफ वॉटर गार्डन यासारख्या विविध गोष्टी तयार करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता त्या पात्र झाल्या आहेत. या मुली आता एप्रिल महिन्यात अमेरिकेला जाणार आहेत.
हेही वाचा - वृत्तपत्र घेऊन जाणाऱ्या बोलेरोची ट्रॅक्टरला धडक, २ जण ठार
या मुलींमध्ये रुचिका मुंडाले, स्नेहल गवई, प्रांजली सदांशीव, प्रणाली इंगळे, अर्पिता लनगोटे, सानिका काळे, आचाल दाभाडे, गौरी झाम्बरे, समीक्षा गायकवाड, सायली वाकोडे, अंकिता वजिरे, निकिता वसतकार, गायत्री तावरे, पूजा फुरसुले यांचा सहभाग होता. त्यांना काजल राजवैद्य, विजय भट्टड, अर्जुन देवरणकर, ऋषभ राजवैद्य, पल्लवी करमकर, मैथिली पाठक, शर्वरी धारस्कर, अजय मलीये यांचे मार्गदर्शन लाभले.