अकोला -औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या राजकारण सुरू आहे. यासंदर्भात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी यासंदर्भात वाद किंवा राजकारण करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानूसार विकासात्मक कामे करणे आवश्यक असल्याचे माणिकराव ठाकरे म्हणाले. अकोला येथून किसान विकास मंचतर्फे दिल्ली येथील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमत ते आले होते. यावेळी त्यांनी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली.
विकास महत्त्वाचा, नाव बदलणे नाही-
माणिकराव ठाकरे म्हणाले, औरंगाबाद शहराच्या नामांतराचा वाद आहे, असे मला वाटत नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयाप्रमाणे विकासाची कामे झाली पाहिजेत. त्यामुळे जो विषयच नाही त्यावर राजकारण करण्याची गरज नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यामध्ये कोणाच्याही नाराजीचा प्रश्न नाही. ज्यावेळी हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यावेळी न्यायालयाने म्हटले की, विकास महत्त्वाचा आहे, नाव बदलणे महत्त्वाचे नाही. नाव बदलण्याचे राजकारण किंवा त्याला बळ देण्याचा प्रकार कोणी करायला नको, असे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले.