अकोला - महाशिवरात्रीनिमित्त गोपालखेड येथील पूर्णा नदीवर असलेल्या स्वयंभू महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी उसळली. भूसपाटीपासून १०० फूट खोल भूगर्भात असलेल्या स्वयंभू महादेवाला महाशिवरात्रीआधी ग्रामस्थ मातीचे उत्खनन करून भाविकांच्या दर्शनासाठी खुले करतात.
पानेट या गावाजवळील पूर्णा नदीच्या पायथ्याशी असलेल्या 'श्री मारुती व ब्रह्मचारी महाराज संस्थान'च्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त हे शिवकार्य केल्या जाते. गोपालखेड येथील ग्रामस्थ महाशिवरात्रीच्या १५ दिवसांमध्ये या पिंडीचे दर्शन व्हावे म्हणून माती उत्खनन करतात. त्यासोबतच ब्रह्मचारी महाराजांच्या मंदिरातील गाळ काढून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करतात. महाशिवरात्रीच्या ७ दिवसांआधी येथे सप्ताह आयोजित करण्यात येतो. या सप्ताहाला गोपालखेड गावातील व आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजेरी लावतात.