अकोला : कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 व 22 ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावे यासह इतर मागण्यांसाठी कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या 22 व्या दिवशी विद्यार्थ्यांनी ही आंदोलन सुरूच आहे. शासनाने व विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
तत्काळ भरती प्रक्रिया :महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये चारही विद्यापीठातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 आणि घेण्यात येणारी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 ला तत्काळ स्थगिती अशी मागणी विद्यार्थांनी केली आहे. तसेच कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय पूर्ववत करण्यात यावा, स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करावे, मृद, जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना पात्र करून कृषी अभियंतांची तत्काळ भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशा विद्यार्थांच्या मागण्या आहेत.
गेल्या 22 दिवसांपासून आंदोलन :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय इतर शाखेप्रमाणेच समाविष्ट करण्यात यावा, या इतर मागण्यांसाठी या विद्यार्थ्यांची गेल्या 22 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे अद्याप पर्यंत राज्य शासन त्यासोबतच कृषी विद्यापीठाकडूनही लक्ष दिले गेले नाही. परिणामी, या विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू असे विद्यार्थ्यांनी यावेळी जाहीर केले आहे. या आंदोलनामध्ये दीपक पाटील, किशोर आरगडे, विशाल लाटेवार, अनिकेत राऊत, दुष्यंत रहंगडाळे यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आहेत.